प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवार दि २१ एप्रिल रोजी रात्री धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर शहरातील जवाहर नगर सरनाईक वसाहतीत रात्री अकराच्या सुमारास सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर याच्यावर गोळीबार केला. त्याच्या पायाला गोळी लागली असून जखमी शाद शौकत मुजावर वर प्रमिलाराजे रुग्णालय सीपीआर येथे उपचार उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पायात घुसलेली गोळी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आली आहे.
दरम्यान या गोळीबाराच्या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चारचाकी गाड्या आणि जमीन खरेदी विक्री करण्याचं काम शाद करतो. शाद मुजावर त्याच्या मित्रांसोबत रात्री त्याच्या घराजवळ असलेल्या कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या सहा ते सात जणांनी शाद शौकत मुजावर च्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी शादच्या मांडीत घुसली. तर दोन गोळ्यांचा नेम चुकल्याने शाद वाचला.शाद शौकतवर सहा ते सात जणांनी गोळीबारासह कोयत्यासारख्या धारदार शस्त्रानेही हल्ला केला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. यातून शादने स्वत:ला कसंबसं वाचवलं. मात्र गोळी लागून तो जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत तत्काळ प्रमिलाराजे रुग्णालय सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराने कोल्हापुर शहरातील जवाहरनगरात तणावाचं वातावरण आहे. हा हल्ला टोळीयुद्धातून झाल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.