प्रशासनाकडून जिल्हयातील मतदान प्रक्रियेबाबतची तयारी अंतिम टप्प्यात

0
72

उष्ण हवामानात मतदारांना किमान सुविधा देण्यात येणार

मतदार जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची अंमलबजावणी

आता मतदारांनी आपला मतदानाचा मूलभूत अधिकार वापरावा

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि.०४ : लोकसभा निवडणूक २०२४ टप्पा ३ मधील निवडणूक प्रक्रियेवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव चिंताजनक नसल्याचे अंदाज आयएमडी तज्ञ व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ यांच्याशी चर्चा करून निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहेत. कोल्हापूर जिल्हयात 47-कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात येत्या मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वा.पर्यंत मतदान होणार आहे. प्रशासनाकडून जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक किमान सुविधांसह, मनुष्यबळ पुरवठा याबातची कामे अंतिम टप्प्यात असून निर्विघ्न आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठीची तयारी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. उष्ण हवामानात मतदारांच्या रांगा बसण्याच्या व्यवस्थेसह सावलीत असतील, पिण्याच्या पाण्याची, ओआरएसची व्यवस्था तसेच मदतीसाठी स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांनी दिली.

   दिनांक 7 मे रोजी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येवून मतदान करावे यासाठी जिल्हयातील सर्व शासकीय तसेच काही खाजगी आस्थापना मतदार जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवित आहेत. मानवी रांगोळी, रन फॉर वोट, पालकांना पत्र, सामाजिक माध्यमांवरील रील्स, पथनाट्य, जनजागृतीपर व्हिडीओ, प्रभात फेरी, एफएम-रेडिओ कार्यक्रम, मतदान शपथ अशा अनेक उपक्रमातून मतदारांपर्यंत पोहचून मतदान करण्याचा संदेश दिला आहे. मतदारांनी अशा विविध कार्यक्रमातून उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला आहे. त्यामूळे येत्या 7 मे रोजी मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडून मतदान केंद्रावर आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावतील अशी अशा जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी व्यक्त केली.  

   कोल्हापूर जिल्हयाची मतदान टक्केवारीतील ओळख प्रत्येक निवडणूकीमधे अग्रस्थानी असते. कोल्हापूर जिल्हा व जिल्हयातील प्रत्येक मतदार यासाठी आपले योगदान देत आहेत. यावेळी मागील निवडणूकीत मतदान केलेल्या सर्व 71 टक्के मतदारांनी मतदान करावेच, त्याचबरोबर मतदान न केलेल्या 29 टक्के मतदारांनीही मतदान करावे. यावेळी नवमतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांनीही प्रत्यक्ष मतदानाचा अधिकार वापरून आपल्या पहिल्या मतदानाची नोंद करून घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले. मतदार कामगारांना सुट्टी देण्यात आली आहे, नवमतदारांना आता उन्हाळ्याच्या सुट्टया आहेत तसेच जेष्ठ व दिव्यांगानाही चांगल्या सोयी सुविधा आयोगाकडून दिल्या जात आहेत. त्यामूळे मतदान करण्यासाठी, लोकशाहीच्या उत्सवामधे सहभागी होण्यासाठी सर्व मतदारांनी बाहेर पडावे, निवडणूक प्रशासन प्रत्येक मतदाना केंद्रावर आपल्या स्वागतासाठी तयार आहे असा संदेशही निवडणूक विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here