प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झालं. या मतदानानंतर, ज्या त्या उमेदवारांचे समर्थक आता आकडेवारीत व्यस्त झाले असल्याचं चित्रं समोर येतं आहे. प्रत्येक उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत. त्यासाठी काहींनी लाखांच्या पैजा लावल्या आहेत. जगात भारी आम्ही कोल्हापूरी आता अशा पैजांमुळं देखिल चांगलंच चर्चेत आल आहे.
कागल तालुक्यातील मंडलिक समर्थक मुरगूडचे माजी नगरसेवक पैलवान आनंद मांगले आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे समर्थक सुधाकर साळोखे यांच्यात १० लाख रुपयांची पैज लागली आहे. या पैजेचे दहा दहा लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
याशिवाय कोल्हापुरातील राजारामपुरी येथील असिफ मुल्लानी यांनी शाहू महाराज निवडून येतील असा दावा केला आहे तर अमर निंबाळकर यांच्या मते संजय मंडलिक हेच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यातून या दोघांच्यात १ लाख रुपयांची पैज लागली आहे. दोघांनीही दुर्गेश लिंग्रज यांच्याकडं आपले पैसे जमा केले आहेत. ज्याचा उमेदवार निवडून येईल त्याला एक लाख रुपये मिळणार आहेत. या पैजेची जोरदार चर्चा सध्या कोल्हापूर शहरात सुरू आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी श्रीमंत शाहू महाराज निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे. शाहू महाराज निवडून आल्यानंतर कोल्हापुर शहरातील जवाहरनगरमध्ये शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.