कोल्हापूर प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या मानवाड येथे रविवारी रात्री संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाला. घोरपडे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महायुतीत सामील असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड (ता. पन्हाळा) येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. परत येताना मानवाडलगत रस्त्याशेजारी सहा-सात अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी, असा घोरपडे यांचा समज झाला. त्यांनी गाडी बाजूला घेतली. घोरपडे गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता काठी आणि धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला.
खासगी रुग्णालयात उपचार सुरू- घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉ. शुभम जाधव हे खाली उतरले. यावेळी संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. शेतवाडीतून पळत असताना त्यांनी दगडफेक केली. त्यामध्ये गाडीचेही नुकसान झाले. संताजी घोरपडे यांच्या हाताला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी त्यांची विचारपूस करण्याकरिता गर्दी केली. प्राथमिक उपचार करून घोरपडे यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अज्ञातांविरोधात कळे पोलिसात गुन्हा दाखल- विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवारावरच जीवघेणा हल्ला झाला. याबाबतची माहिती मिळताच कळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. संताजी घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात 6 व्यक्तींविरोधात कळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथक नेण्यात आली आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी दिली.