प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा सह पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज १८ नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी सहा पर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यापूर्वी आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांचे नेते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. जे.पी. नड्डा हे ठाणे, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज गोंदिया आणि नागपुरात सभा आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत, त्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये रोड शो आणि जाहीर सभांना संबोधित करतील.निवडणूक आयोगाकडून मनाई आदेश आज सोमवार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ते मतदान पार पडेपर्यंतच्या कालावधीत टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.