
एस पी नाईन पुणे प्रतिनिधी
पुणे, २७ एप्रिल : पुणेकरांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून खासदार जनसंपर्क सेवा अभियान उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, जनता दरबारच्या माध्यमातून यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन; जे प्रश्न लगेचच सुटतील, अशा प्रश्नांच्या बाबतीत त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. तसेच, राज्य सरकारच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी गरजू नागरिकांना शासनाच्या लोकोपयोगी योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्रही देण्यात आले. वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषय या संदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. नागरिकांकडून आलेले प्रश्न सोडवण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करत तातडीने कामे मार्गी लावण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुरलीधर मोहोळ यांनी दिले.यावेळी विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉलची उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या अभियानाच्या प्रारंभी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एरंडवणे येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्या मंदिर येथे झालेल्या या अभियानाला कोथरूडकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, मा. नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.