
पन्हाळा प्रतिनिधी – पांडुरंग फिरींगे
मोहरे (ता. पन्हाळा) :
मोहरे हायस्कूल, मोहरे येथे १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. जवळपास २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मस्ती, शिक्षकांचा वचक आणि गोड आठवणींनी रंगतदार वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाला प्राचार्या सौ. लतिका मोहिते, सेवानिवृत्त शिक्षक आर. एस. पाटील व व. जे. एन. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून शिक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय देत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
गप्पांच्या ओघात “शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही यशस्वी आहोत,” अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. गाणे, नृत्य, विनोदी गप्पा आणि स्नेहभोजनात सर्वांनी आनंद लुटला.
राजकारण, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी विशेषतः बाहेरगावाहून या स्नेहमेळाव्यासाठी हजेरी लावली. जुन्या मैत्रीचा, आठवणींचा आणि शिक्षकांविषयीच्या कृतज्ञतेचा हा अविस्मरणीय सोहळा सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला.

