
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
निपाणी येथे नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड प्लस निपाणी मॅरेथॉन २०२५ या स्पर्धेत श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्सनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
या स्पर्धेत कॅडेट साक्षी राजाराम विचारे हिने २५ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास ३५ मिनिटांत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला असून ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिच्या या यशामुळे कोतोलीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच कॅडेट सायली दीपक पाटील हिने १० किलोमीटरचे अंतर १ तासांत पूर्ण करून द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक आपल्या नावावर केले. दोन्ही विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि शिस्त दिसून येते.
या यशस्वी विद्यार्थिनींना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. मनीषा सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून दोन्ही कॅडेट्सचे अभिनंदन होत आहे.

