प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल 20 हजार पेक्षा जास्त मानसिक रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
झोप न येणे, निराश वाटणे, वैफल्य, कौटुंबिक तणाव, प्रेम प्रकरण व कर्जाचे डोंगर अशा विविध कारणाने तणावात असलेली व्यक्ती आत्महत्येचा मार्ग पत्करीत आहे. संयम न बाळगता धीर सोडणाऱ्या व्यक्तींना आत्महत्या हाच एकमेव मार्ग दिसत असतो.
तणावात असलेली व्यक्ती परिस्थितीशी लढण्याच धाडस सोडून आत्महत्येचा मार्ग पत्करत असते.अशातच कोविडकाळात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडून गेले होते. अनेकजण कोविडच्या भीतीमुळे मनातून खचून गेले होते.
मानसिक तणावात राहता राहता हजारो लोक मनोरुग्ण होऊ लागले आहेत. गोंदिया जिल्ह्यात अवघ्या पाच महिन्यांत तब्बल 20 हजार 281 लोकांना मानसिक आजार असल्याचे खळबळजनक आकडे पुढे आले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात आर्गेनिक मेंटल डिसिज, दारूमुळे मानसिक रोगी होणे, स्मृतिभ्रंश, भीती वाटणे, दूर्धर आजार, स्किझोफ्रेनिया, उदासीनता, व्यसनाधीनता, अकस्मार (मिरगी), गतिमंद, निद्रानाश आणि इतर अनेक प्रकारचे मानसिक आजार लोकांना होताना दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्यात सन 2023 मधील एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची परिस्थिती पाहता तब्बल 20 हजार 281 जण मानसिक रुग्ण असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.