संजय मंडलिक यांचा पराभव करणे देवालाही शक्य नाही आणि गरज पडली तर हेलिकॉप्टरने मतदार आणू असे म्हणणारे अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सगळी ‘व्यवस्था’ करायचे ठरल्याचे दिसतेय. भरपूर घबाड दिसतेय, त्यामुळेच मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी सुरू आहे. यामुळे आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत हे दिसतेय. समोरच्या बाजूने किती माया गोळा करण्यात आली हे देखील दिसत असून आम्ही जनतेच्या साथीने आणि जनतेच्या जिवावर निवडणुकांना सामोरे जातोय. जनता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकून महाराष्ट्राला पुन्हा रुळावर आणण्याचे काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांचे हे वक्तव्य हास्यस्पद असल्याचे म्हटले.फडणवीस यांनी भेट घेतलेले माने कुटुंबीय शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राहिले असून त्यांना कधीही विचारले तर 200 टक्के शरद पवार यांचेच नाव घेतील. पण मत बदण्यासाठी वेगवेगळ्या दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी लगावली.

