
परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण


प्रतिनिधी – सुदर्शन पाटील
कुंभारवाडी ता. पन्हाळा येथे वासरावर हल्ला करून बिबट्याने शेतात नेऊन फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.


शनिवारी सकाळी गोठ्याच्या पिछाडीस शेतात अर्धवट खाल्लेल्या स्थितीत वासरू मिळून आले. भरवस्तीत बिबट्याने गोठ्यात घुसून वासरावर हल्ला केल्याने कुंभारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, बिबट्याच्या पायांचे ठसे मिळून आले. यावेळी त्यांनी पंचनामा केला. वासराच्या आमिषाने बिबट्या
पुन्हा येईल, यादृष्टीने शनिवारी रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे कॅमेरे लावले आहेत. शुक्रवारी रात्री लोकांना बिबट्या दिसून आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळावी व वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शहाजी नायकवडे, आकाश कर्ले, विशाल पाटील यांनी केली आहे.
यावेळी बाजारभोगाव वनपाल एन. एस. पाटील, कळे वनरक्षक एस. व्ही. काशीद, वनमजूर निवृत्ती चौधरी, राजन भंडारी, किरण कुंभार, संभाजी चौगले, सरपंच व पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते

