ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानासाठी नमुना 12 ड अर्जांचे घरोघरी वाटप

0
83

प्रतिनिधी मेघा पाटील

17 एप्रिलपर्यंत अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावेत

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील 47- कोल्हापूर व 48 – हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातील निवडणूक दोन निवडणूक निर्णय अधिकारी व 12 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत घेण्यात येणार आहे. निवडणुकीत 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणा-या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 ड अर्जांचे घरोघरी वाटप केले जात असून, हे अर्ज 17 एप्रिलपर्यंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. संबंधित नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 47 – कोल्हापूर व अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 48- हातकणंगले यांनी केले आहे.

यासाठी दिव्यांग मतदाराचे अपंगत्व 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमूना 12 ड चे वाटप घरोघरी करण्यात आले आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा मतदानाचे एक दिवस अगोदरपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल. घरी येवून टपाली मतदान घेण्यासाठीची तारीख व वेळ याची माहिती BLO यांच्या मार्फत कळविण्यात येईल. तसेच ज्या 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करावयाचे असल्यास ते मतदार केंद्रावर जावून मतदान करण्याचा पर्याय घेवू शकतात, असेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. येडगे यांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here