लाईट बिल जास्त आल्या कारणाने महावितरण कर्मचाऱी महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार; महिलेचा मृत्यू, बारामतीतील धक्कादायक घटना..

0
97

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

वीज बिल जास्त येते. त्यामुळे घरचा वीज मीटर त्वरित तपासावा, अशी मागणी करूनही ‘महावितरण’ने दुर्लक्ष केल्याने मोरगाव ता. बारामती येथील एका तरुणाने वीज उपकेंद्रात जाऊन जाब विचारत रिंकू राम थिटे या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिजित दत्तात्रेय पोटे वय २६, रा. मोरगाव, असे कोयत्याने हल्ला केलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोटे याने आठ दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील वीज मीटरचे वीज बिल जास्त प्रमाणात येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरित तपासावा, याबाबत तक्रार दाखल केली होती.
मात्र, त्याची दखल घेतली जात नाही, असे वाटल्याने त्याने चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बुधवार दि २४ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान जाब विचारला. यामध्ये रिंकू थिटे या तांत्रिक कर्मचारी महिला त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने त्यांच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.रिंकू थिटे या मूळ लातूरच्या असून विद्युत वितरण कंपनीत काम करत असल्यामुळे त्या मोरगावमध्ये पती राम यांच्यासह गेली दहा वर्षापासून राहात होत्या. त्यांना चार वर्षाचा मुलगा असून, मूळ गाव दुष्काळग्रस्त असल्याने उपजीविकेसाठी त्या नोकरी करत होत्या. सरळमार्गी आणि मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष म्हणून त्या परिचित होत्या. चार वर्षांचा त्यांचा मुलगा आईविना पोरका झाला. त्या दहा दिवसांची सुट्टी उपभोगून बुधवारीच मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.ज्याने हल्ला केला त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनिट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्यांचा वापर ४० ते ७० युनिटमध्ये आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनिटने वाढला व त्याचे बिल ५७० रुपये आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here