प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचा उपक्रम म्हणून जिल्ह्यातील मतदारांकडून “मी मतदान करणारच” अशी ऑनलाईन शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
1 मे रोजी जिल्हा परिषद स्तरावर 6 लाख 57 हजार 347 तर महानगरपालिका स्तरावरील 8 हजार व नगरपालिका स्तरावरील 8 हजार अशी एकूण 6 लाख 73 हजार 347 मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा “स्वीप”चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला.
केवळ 12 तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी प्रतिज्ञा घेण्याची भारतातील ही विक्रमी नोंद ठरण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मतदान करण्याकरिता प्रबोधन करणे व त्यांनी शपथ घेण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यात आले. या बाबत सर्व यंत्रणांच्या बैठका घेण्यात आल्या. सर्व शासकीय व इतर विभागांना सोबत घेऊन 1 मे महाराष्ट्र दिना दिवशी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमार्फत गाव स्तरावर यंत्रणा तयार करुन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा म्हणजेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्याची शपथ घेण्याबाबत प्रबोधन केले.
“मी मतदान करणारच” या शपथ उपक्रमाची नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सूक्ष्म नियोजनातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी जिल्हा स्तरावरुन कार्यवाही केली. जिल्हा परिषदेकडील सर्व खाते प्रमुखांनी तालुका संपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. तालुका स्तरावरील सर्व गटविकास अधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. नागरी भागामध्ये सहकारी संस्थेचे उपनिबंधक नीलकंठ करे व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ लेखाधिकारी वर्षा परीट- साळुंखे यांनी कार्यवाही पूर्ण केली.