उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या-निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

0
115

प्रतिनिधी मेघा पाटील

  • जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
  • आचारसंहिता भंगाच्या घटनांवर तात्काळ कार्यवाही करा
  • मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुविधा द्या
  • स्थिर व भरारी पथके गतिमान करा; तपासण्यांची संख्या वाढवा

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आचारसंहिता भंगाची कोणतीही घटना आढळून आल्यास तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

  निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी श्री.शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, अपर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.



 जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, सध्या प्रखर उष्ण हवामान असून मतदानाच्या दिवसापर्यंत आणखी उष्ण हवामानात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरुन खबरदारी घ्यावी. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर सेवा सुविधा उपलब्ध करुन द्या. मतदान केंद्रांच्या ठिकाणी स्वच्छता करुन घ्या. या ठिकाणची विद्युत व्यवस्था, पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करा. सावलीसाठी केंद्राबाहेर मंडप उभारुन घ्या. तसेच पिण्याच्या पाण्याची व खुर्च्यांची व्यवस्था करा. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून प्रत्येक मतदान केंद्रांवर त्या त्या सुविधा द्या. आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होईल, यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये आयत्या वेळी लागणाऱ्या औषधांचा साठा तयार ठेवा. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवा. एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण द्या. वाड्या वस्त्यांवर लांब मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांची ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात चांगले मतदान झाले आहे. या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 85 टक्क्यांहून अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. गृहभेटीवर भर देण्याबरोबरच विविध माध्यमांतून जनजागृती करा. मतदार स्लिपचे वाटप पूर्ण करुन घ्या. शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध विभाग, महानगरपालिका व गृहनिर्माण संस्था व अन्य संस्थांचे सहकार्य घ्या. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानापेक्षा या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा टक्का घटणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी दिले.

आचारसंहिता अंमलबजावणी बाबत बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आचारसंहिता भंगाची अथवा गैरकृत्य घडत असल्याचे आढळून आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करा. विना परवाना लावलेले बॅनर तपासा. वाहनांची तपासणी करा. स्थिर व भरारी पथके गतिमान करुन तपासण्यांची संख्या वाढवा.

 जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर कसलीही अडचण येणार नाही, तसेच मतदारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या. दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर उपलब्ध करून द्या. महिला मतदान केंद्रे, युवा मतदान केंद्रे, दिव्यांग मतदान केंद्रे अशी आदर्श मतदान केंद्रे तयार करुन त्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अंगणवाडी सेविकांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांमध्ये जनजागृती करावी.  सर्व विभागांच्या समन्वयाने जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यामध्ये योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत तसेच सुरेश जाधव यांनी मतदानादिवशी मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत तर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देवून सूचना केल्या.

 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी, आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवर करण्यात येत असलेल्या तयारीची दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here