प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक रात्र कोल्हापुरात घालवून चांगलीच साखर पेरणी केली आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखर कारखानदार व सहकारी बँकांच्या प्रमुख मंडळींशी चर्चा करून त्यांनी योग्य तो संदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस ठोकलेला तळ, पडद्यामागून लावलेल्या जोडण्या पाहता, गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे शाहू छत्रपती व शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे. शाहू छत्रपती यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने ते मतदारसंघात वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले होते. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा शेवटपर्यंत घोळ सुरू राहिल्याने प्रचाराला उशिरा सुरुवात झाली. मात्र, महायुतीची फौज घेऊन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. कोल्हापुरात सरळ लढत होत असल्याने विजयाचा मार्ग सतत बदलत आहे. ‘हातकणंगले’मध्ये उबाठा गटाकडून अचानक सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर करून ते हवा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. उमेदवारी मिळते की नाही? या गोंधळात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यात धैर्यशील माने यशस्वी झाले. आघाडीला आपल्याशिवाय पर्याय नाही, हे गृहीत धरून कामाला लागलेले राजू शेट्टी यांना स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर येथे तिरंगी लढत होत आहे. दोन्ही मतदारसंघांतील अंदाज महायुतीच्या नेत्यांना आल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे तळ ठोकला आहे. केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह हे एक दिवस येऊन गेले. त्यांना ज्यासाठी आणले होते, तो उद्देश सफल झाल्याची चर्चा आहे.दोन्हीकडे ११ सहकारी, तर १२ खासगी कारखानदार आहेत. त्या सगळ्यांसह प्रमुख बँकांचे पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला असून, त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश पोहच केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही जोडण्या लावल्या असून, त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून जोरदार घडामोडी घडत आहेत.जोडण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम महायुतीच्या उमेदवारांसाठी जोडण्या लावण्यांसाठी ठाणे, पुण्यातील टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. आघाडीतील काही मासे गळाला लागतात का? यावर ते नजर ठेवून आहेत.