
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथून प्रा. प्राची अशोकराव जगताप–इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी “कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात जाणिव–जागृती कार्यक्रमाची निर्मिती व त्याची परिणामकारकता अभ्यासणे” या विषयावर सखोल संशोधन करून ही पदवी संपादन केली.सदर संशोधन कार्य त्यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक प्रा. डॉ. सुग्रीव श्रीमंत गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने दिनांक १९ जानेवारी रोजी त्यांना अधिकृतपणे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.गेल्या चार वर्षांच्या कालावधीत प्रा. प्राची जगताप–इंगळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देत विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये जागतिक तापमानवाढीबाबत जाणिव-जागृती निर्माण केली. त्यांच्या संशोधनात विद्यार्थ्यांमध्ये जागतिक तापमानवाढीविषयीची समज, सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची जबाबदारी विकसित करण्यासाठी प्रभावी शैक्षणिक कार्यक्रम कसे उपयुक्त ठरतात, याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन पर्यावरण शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.सध्या प्रा. प्राची जगताप–इंगळे या प्रताप ज्युनिअर कॉलेज, वडणगे येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक यशासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष मा. अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव सौ. शुभांगी गावडे, कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्री श्रीराम साळुंखे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.डॉ. प्रा. प्राची अशोकराव जगताप–इंगळे या विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. अशोकराव जगताप यांच्या कन्या असून प्राचार्य श्री. सोनिक पंढरीनाथ इंगळे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

