
कोल्हापूर प्रतिनिधी : जानवी घोगळे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिओ-फेस्ट २०२६’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल, खगोलशास्त्र व अवकाश संशोधनाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी भूगोल विषयातील सखोल ज्ञान तपासणारी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन गटांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी हौशी खगोल अभ्यासक श्री. अनिल गवळी यांनी ‘विश्वाचा पसारा’ या विषयावर अत्यंत रोचक व ज्ञानवर्धक व्याख्यान दिले. याच दिवशी रात्री ७ ते ९ या वेळेत आकाश निरीक्षण (Sky Watch) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, संशोधक व प्राध्यापकांनी घेतला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी क्वान्टोक्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री. शुभम यादव यांनी ‘अवकाश संशोधन व सुदूर संवेदन क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावरील उच्च श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.प्राचार्य डॉ. संजय थोरात व IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक व पी.जी. समन्वयक डॉ. एच. पी. पाटील, कार्यशाळा समन्वयक डॉ. शुभांगी काळे, विभागप्रमुख डॉ. जी. एस. उबाळे यांच्यासह डॉ. निशा सुर्वे, डॉ. सिद्धार्थ घोडेराव, डॉ. विठ्ठल पाटील, सागर पवार, आर्या जोशी, वैशाली पालकर व अश्विनी मुरवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास डॉ. बापुजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, फोटोग्राफी विभाग प्रमुख श्री. रवी सुतार तसेच महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतिमा हजारे व कु. धनश्री नांगरे यांनी केले, तर तांत्रिक सहाय्य श्री. नामदेव माने व श्री. राम बोंगे यांनी केले.

