विद्यार्थ्यांच्या खाद्य महोत्सवात ‘बौद्धिक खाद्य’ ठरले केंद्रबिंदू

0
9

तेजस मुक्त विद्यालयातील फन-फेअर दरम्यान राजनंदिनी पवार हिच्या पुस्तक स्टॉलवर खरेदीसाठी विद्यार्थ्यांची उसळलेली गर्दी.

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत परिसरातील श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वसंतराव देशमुख हायस्कूल, तेजस मुक्त विद्यालय, सन्मित्र विद्यालय व श्री वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल या देशमुख शिक्षण समूहातील शाळांनी संयुक्तपणे खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे परिसर उत्साहाने फुलून गेला होता. मात्र या महोत्सवात एका वेगळ्या आणि अभिनव स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तेजस मुक्त विद्यालयातील इयत्ता चौथीत शिकणारी कु. राजनंदिनी दिग्विजय पवार हिने चक्क पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारून ‘बौद्धिक खाद्य’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

‘राजनंदिनी ग्रंथ भांडार’ या नावाने उभारलेल्या स्टॉलवर ‘अभिनव बौद्धिक खाद्य उपक्रम’, ‘येथे बौद्धिक खाद्य मिळेल’, ‘भेट देऊ स्टॉलला – मित्र करू पुस्तकाला’, ‘आम्ही दोघे बहीण-भाऊ ज्ञानरूपी खाद्य खाऊ’, ‘करू खरेदी पुस्तकांची – कास धरू ज्ञानाची’ अशा आकर्षक फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.थोर-मोठ्यांची चरित्रे, गोष्टींची पुस्तके तसेच सामान्यज्ञान विषयक पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. फक्त २० किंवा ४० रुपयांत पुस्तक मिळेल या आवाहनाला विद्यार्थ्यांसह पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका तासात ६८ पुस्तके विकली गेली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.या उपक्रमासाठी कु. राजनंदिनीला तिची आई सौ. श्रद्धा दिग्विजय पवार, वडील प्रा. डॉ. दिग्विजय पवार, आजोबा – राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. जे. के. पवार, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई वसंतराव देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. पी. साळोखे, वर्गशिक्षक सुशांत इंगळे आदींचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.मुलांना योग्य प्रोत्साहन दिल्यास ती पुस्तके खरेदी करतात आणि वाचनाची गोडीही निर्माण होते, हेच या अभिनव उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here