दिगवडे गावात फळ प्रक्रिया प्रात्यक्षिक : कृषी कन्यांकडून टुट्टी-फ्रुट्टी निर्मितीचे मार्गदर्शन

0
17

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

दिगवडे
येथील गावात फळांवर मूल्यवर्धन या विषयावर टुट्टी-फ्रुट्टी तयार करण्याचे प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. हा उपक्रम राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषी शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास गावातील शेतकरी, महिला व स्वयंसहायता (बचत) गटांच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या प्रात्यक्षिकात पपईसारख्या सहज उपलब्ध फळांपासून टुट्टी-फ्रुट्टी कशी तयार करावी, त्यासाठी लागणारे साहित्य, प्रक्रिया पद्धत, स्वच्छतेचे महत्त्व, साखरेच्या पाकाची योग्य तयारी, रंग व सुवासिकेचे प्रमाण, साठवणूक व पॅकिंग याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच घरगुती तसेच लघुउद्योग स्तरावर फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या संधी, खर्च–नफा विश्लेषण आणि बाजारपेठेतील मागणी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी कन्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलेल्या या प्रात्यक्षिकामुळे गावकरी व स्वयंसहायता गटातील महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. फळांचे मूल्यवर्धन केल्याने नासाडी टाळता येते, अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांनी स्वतः टुट्टी-फ्रुट्टी तयार करून पाहिली व भविष्यात स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून उत्पादन व विक्री करण्याचा संकल्प व्यक्त केला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून शेतकरी व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या वेळी कृषी कन्या स्नेहल चौगुले, के. प्रवल्लिका, सुनिता भडारडा, वेदांती घाटोल, स्निशा एस. यांनी प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे, डॉ. बी. टी. कोलगणे, डॉ. जे. एस. पाचपुते तसेच कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एम. खराडे यांनी मार्गदर्शन केले.
फोटो ओळ -दिगवडे येथील कृषी कन्या यांच्या वतीने महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here