विवेकानंद कॉलेजमध्ये परंपरेचा जागर; पारंपरिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा

0
144

कोल्हापूर (प्रतिनिधी):पांडुरंग फिरींगे
भारतीय संस्कृतीचा वारसा, परंपरेचे सौंदर्य आणि तरुणाईचा उत्साह यांचा सुंदर संगम विवेकानंद कॉलेजमध्ये अनुभवायला मिळाला. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला पारंपरिक वेशभूषा दिन अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक पोशाखात नटलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी पाहताच संपूर्ण महाविद्यालय परिसर संस्कृतीच्या रंगांनी उजळून निघाला.

मराठमोळा फेटा-धोतर, पैठणी-नऊवारी, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, दक्षिण भारतीय वेशभूषा अशा विविध प्रादेशिक पोशाखांतून विद्यार्थ्यांनी “विविधतेतून एकता” हा भारतीय संस्कृतीचा संदेश प्रभावीपणे मांडला. पारंपरिक वेशभूषेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभूतपूर्व चैतन्य, आत्मीयता व अभिमानाची भावना निर्माण झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “परंपरा जपणे म्हणजेच संस्कृती जिवंत ठेवणे होय. आधुनिकतेसोबत सांस्कृतिक मुळांशी नाते जपणारी पिढीच सक्षम समाज घडवू शकते.”

संपूर्ण कार्यक्रम पर्यावरणपूरक वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आरिफ महात यांच्या मार्गदर्शनाखाली सिनिअर कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. बी. टी. दांगट यांनी केले, तर प्रा. एच. व्ही. चामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपरिक वेशभूषा दिनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतीविषयी अभिमान, परंपरेविषयी जिव्हाळा आणि एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here