आतंकवाद आणि क्रिकेट एकाच वेळी खेळू शकत नाही !

0
59

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

केवळ हस्तांदोलन टाळणे पुरेसे नाही; भारत-पाक क्रिकेट सामने रद्द करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणार्‍या ’आयसीसी वर्ल्ड कप’ स्पर्धेमध्ये भारतासोबत सामना खेळण्याची तयारी दर्शवली असली, तरी भारत सरकारने या प्रस्तावाला बळी पडू नये. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नये, ही भारताची ठाम भूमिका असायला हवी. क्रिकेटच्या मैदानात केवळ हस्तांदोलन टाळून पाकिस्तानचा निषेध करणे पुरेसे नाही. तर क्रिकेटच नव्हे कोणत्याही प्रकारे पाकिस्तानशी संबंध ठेवू नये. ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत’, अशी ठाम भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनादवारे केली आहे. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार हनुमंत म्हेत्रे यांनी स्वीकारले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, ‘व्हिनस कॉर्नर मित्र-मंडळ’ संस्थापक-अध्यक्ष श्री. शशिकांत बीडकर, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, भाजपचे श्री. एस.बी. देवणे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. अजित सुस्वरे आणि श्री. दीपक कातवरे उपस्थित होते.

समितीने पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने ‘सिंधू जल करारा’च्या वेळी पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही, अशी कणखर भूमिका घेतली होती. तीच भूमिका क्रिकेट संदर्भातही घ्यावी. सीमेवर आमचे जवान रक्त सांडत असताना आणि देशात ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी गंभीर मोहीम सुरू असताना, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे, हा आपल्या जवानांचा घोर अपमान आहे.

पाकिस्तानी खेळाडू हे केवळ खेळाडू नसून अनेकदा ते भारतविरोधी अजेंडा राबवताना दिसतात. शाहीद आफ्रिदी आणि जावेद मियांदाद अनेकदा काश्मीरवर गरळ ओकतात, तर शोएब अख्तरने उघडपणे ‘गझवा-ए-हिंद’चे (भारतावर इस्लामिक आक्रमणाचे) समर्थन केले होते. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफिझुर रहमान याला ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातून वगळण्यास भाग पाडले आहे. तीच कठोर भूमिका आता पाकिस्तानसोबत घ्यायला हवी. खेळ आणि जिहाद हातात हात घालून चालू शकत नाहीत, भारत सरकारने ठणकावून सांगावे, अशी मागणी समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here