कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्गावर सकाळपासून पारंपरिक ढोल, ताशा पथकांनी वातावरण निर्मिती करत चांगलाच रंग भरला आहे.
यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीतील एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य पथक, महालक्ष्मी प्रतिष्ठानचे झांज पथक, बिरोबा धनगरी ढोल, महिला लेझीम पथक या पारंपरिक वाद्यांच्या थेक्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
कोल्हापुरातील सर्वात पहिले ढोल ताशा पथक असा नावलौकिक असणाऱ्या “करवीर नाद” या पथकात चार वर्षाच्या मुलीपासून वृध्द महिलाही सहभागी झाली होती.
बिनखांबी गणेश , पापाची तिकटी, गंगावेश या मिरवणूक मार्गावर या पथकाने लक्ष वेधून घेतले.
महिलांच्या लेझीम पथकाने घेतल्या टाळ्या –
पापाची तिकटी येथील कुंभार मंडपाच्या न्यू बाल शिवाजी क्लबच्या गणेश मूर्तीसमोर महिलांच्या लेझीम पथकाने लेझीम खेळून टाळ्या घेतल्या. यामध्ये छोट्या मुलींचा समावेश होता.
खासदारांनी खेळली लेझीम –
खासदार धनंजय महाडिक गुरुवारी लेझीम खेळून गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.